आशय ज्वेलर्समध्ये सोन्याच्या फुल्या गायब; CCTV दाखवण्यास नकार — पीडितेची पोलिसांकडे निराशा व्यक्त

आशय ज्वेलर्समध्ये सोन्याच्या फुल्या गायब; CCTV दाखवण्यास नकार — पीडितेची पोलिसांकडे निराशा व्यक्त
३ ग्रॅम सोन्याच्या फुल्या धुण्यासाठी दिल्या, दुसऱ्या दिवशी दुकानाकडे नाकार; CCTV देण्यासाठी पोलिस आणा अशी मागणी
फलटण (प्रतिनिधी) :
फलटण शहरातील आशय ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात सोन्याच्या फुल्या गायब झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडित रेश्मा नुरमहम्मद शेख (रा. कुरवली खुर्द) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ रोजी दुपारी साधारण १ ते २ च्या सुमारास त्यांनी ३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या फुले धुण्यासाठी आशय ज्वेलर्समध्ये दिल्या होत्या. त्याचवेळी दुकानात कान टोचण्यासाठी आलेल्या लहान मुलीचे काम सुरू असल्याने दुकानदारांचे लक्ष दुसरीकडे होते आणि शेख या बाजारात जाण्यासाठी दुकानातून बाहेर पडल्या.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या दिवशी त्यांच्या लक्षात आले की सोन्याच्या फुल्या दुकानात विसरल्या गेल्या आहेत. तातडीने त्यांनी आशय ज्वेलर्समध्ये जाऊन चौकशी केली असता, दुकानातील कर्मचाऱ्यांनी “आमच्याकडे काही आलेले नाही, तुमच्याकडे असेल तर तुम्हीच दिल्या असत्या” असे उत्तर दिल्याचे सांगितले. यानंतर अनेक वेळा दुकानात जाऊनही पीडितेला फुल्यांबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही.
पीडितेला सांगण्यात आले की, दुकानातील मालक येतील तेव्हा भेटा, मुलगा आल्यावर बोला, अशा शब्दांत रोज टाळाटाळ केली जात होती. या सततच्या ढकलाढकलीला कंटाळून शेख यांनी CCTV फुटेज पाहण्याची विनंती केली. मात्र, दुकानाकडून “पोलिस घेऊन या, त्यांच्याशिवाय CCTV दाखवता येणार नाही” असे सांगून फुटेज दाखवण्यास सरळ नकार देण्यात आला.
दरम्यान, पीडितेने फलटण पोलिस ठाण्यात तक्रार दिली असली तरी आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. CCTV फुटेज मागितल्यावरही दुकानाने कधी मालकाची अनुपस्थिती, कधी मुलगा नाही, कधी सिस्टम सुरू नाही असे कारणे सांगून वेळ मारून नेल्याचा आरोप करण्यात येत आहे.
घटनेनंतर १५-२० दिवस उलटूनही सोन्याच्या फुल्यांचा काहीच मागोवा लागत नसल्याने पीडिता अत्यंत चिंतातूर आहे. “आम्ही प्रामाणिकपणे फुले धुण्यासाठी दिली होती. दुकानातील कर्मचाऱ्यांकडून पारदर्शकतेचा अभाव दिसतो आहे. CCTV फुटेज देण्यास नकार दिला जात असल्याने शंका आणखी गडद होत आहे,” असे पीडितेने सांगितले.
सध्या या प्रकारामुळे आशय ज्वेलर्सच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून ग्राहक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी अशा प्रसंगी तातडीने पोलिसांत तक्रार नोंदवावी आणि CCTV ची प्रक्रिया कायद्यानुसार करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

