एकीकडे बिबट्याची जिवासाठी भिती तर दुसरीकडे रानडुकरांचा धुमाकूळ

- एकीकडे बिबट्याची जिवासाठी भिती तर दुसरीकडे रानडुकरांचा धुमाकूळ
वनविभाग मात्र मस्तपैकी कुंभकर्णी झोपेत,सर्व शेतकऱ्यांमध्ये तिव्र संताप
अर्धापूर :- उध्दव सरोदे –
मागील काही दिवसांपासून अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात धसकी भरली असून ते जिव वाचवण्यासाठी धडपड करीत असून दुसरीकडे पिकांत रानडुकरांचा धुमाकूळ सुरू असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.याउलट अर्धापूर येथील वनविभाग मात्र मस्तपैकी कुंभकर्णी झोपेत असल्याने शेतकऱ्यात वनविभागाच्या बद्दल तिव्र संताप निर्माण झाला आहे.अर्धापूर तालुक्यातील चोरंबा,देळूब बु,बामणी, मेंढला बु,मेंढला खु सह परिसरातील गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे.मागील आठवड्यात चोरंबा शिवारात दोन शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याची चर्चा होती.त्यानंतर या आठवड्यात देळूब बु.शिवारातही बिबट्या दिसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.परिसरात बिबट्याच्या हालचाली सुरू असल्याने संपूर्ण गावांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याच दरम्यान, रानडुकरांच्या कळपांनी रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणे सुरूच आहे.शेतक-यांच्या म्हणण्या नुसार रात्रीच्या अंधारात रानडुक्करांचे थैमान वाढत असून गहू,हरभरा,ज्वारी आदी पिकांवर ते अक्षरशः ताव मारत
आहेत.अनेक शेतकऱ्यांच्या शेतात एका रात्रीत अर्धा-अर्धा एकर क्षेत्रातील पिकांची नासाडी होत असल्याचे चित्र आहे.बिबट्याच्या भीतीने शेतकरी रात्री पिकांची राखण करण्यासाठी शेतात उतरण्यास धजावत नाहीत.शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणे परवडत नाही आणि याचाच फायदा रानडुक्कर घेत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.खरे तर एवढ्या भयंकर व गंभीर संकटातून जात असतांना ताबडतोब वनविभागाने बिबट्याच्या हालाचालींची तात्काळ दखल घेऊन पिंजरे लावावेत,रानडुकरांच्या उच्छादावरही नियंत्रण आणावे व या दोन्ही संकटावर अजून कोणत्या उपाययोजना करून आमचा जीव व पिके वाचवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.तात्काळ योग्य ती उपाययोजना न झाल्यास येत्या काळात पिकांचे अजून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची व एखाद्या शेतकऱ्यांचा जीव जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.त्यामुळे ताबडतोब ह्या समस्या सोडवल्या नाही तर शेतकऱ्यांना पुढील कठोर पाऊल उचलावा लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

